Bharari

Taking Flight…
Subscribe

“रॉकी पर्वतरांग” … पृथ्वीवरील एक स्वर्ग – भाग १

SubscribeFiled Under: Canada, Export, Marathi Articles,by Bhakti

A memoir in Marathi (मराठी) of our week-long road trip in the Canadian Rockies – Heaven on Earth – visiting Banff, Yoho and Jasper National Parks, as well as Calgary and Edmonton in the Province of Alberta.

Click for: Part One | Part Two

लेक लुइस गोंडोलातून (ropeway) दृश्य

लेक लुइस गोंडोलातून (ropeway) दृश्य

पृथ्वीवरचा स्वर्ग बघण्याचा अनुभव आयुष्यात प्रथमच मी घेतला … आणि तो म्हणजे कॅनडा मधील रॉकी पर्वतारांगाना (Rocky Mountains) भेट दिली तेव्हा. तसे पृथ्वीवर बरेच स्वर्ग आहेत पण मी पाहिलेला हा पहिलाच.  डोळ्याचं पारणं फिटलं म्हणतात ना तसं काहीसं झालं मला.  आयुष्यभर पुरेल असं  निसर्गसौंदर्य डोळ्यात भरून आणता येईल, इतकं सृष्टीसौन्दर्याचं लेणं लाभलं आहे या जागेला. शब्दात मांडायला कठीण आणि कॅमेरात टिपता न येणाऱ्या देवाच्या या निर्मितीला फक्त दोनच ठिकाणी जतन करून ठेवता येईल, ते म्हणजे, डोळ्यात आणि मनात.  तुम्हाला वाटेल किती अतिशयोक्ती करतीये हि.  But I really mean it. कधीही संपू नये असं वाटणारा हा प्रवास खरंच अविस्मरणीय आणि अवर्णनीय असा आहे.  शब्द तोकडे पडतात ना ते अशाच ठिकाणी, आणि स्वप्नं साकार होतात, ती हि अशाच ठिकाणी.

तसं पाहायला गेलं तर आमचा प्रवास हा फक्त ९ दिवसांचा होता.  पण प्रत्येक क्षण जगणं आणि साठवून ठेवणं म्हणजे काय असतं हे आम्हाला आज कळतंय.   रॉकी पर्वतरांग हि उत्तर अमेरिकेतील सर्वात लांब पसरलेली पर्वत रांग आहे.  त्याचा काही भाग आल्बर्टा (Alberta) प्रांतात येतो.  रॉकी पर्वतरांगां मध्ये बँफ (Banff) आणि जास्पर    (Jasper) हि दोन महत्वाची राष्ट्रीय उद्यानं (National Parks) आहेत. बँफ हे कॅनडा देशातील सर्वात पाहिलं राष्ट्रीय उद्यान आहे.  आमचा पहिला मुक्काम कॅलगरी (Calgary) ला होता.  आल्बर्टा प्रांतातील कॅलगरी हे बँफ अभयारण्या पासून २ ते २.३० तासांवर वसलेलं शहर आहे.  हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात थंड शहर आहे.  उन्हाळ्याचे २ -३ महिने सोडले तर इथे सतत खूप जास्त थंडी असते म्हणून आम्ही प्रवासासाठी ऑगस्ट महिना निवडला.  जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर हे महिने कॅनडा मध्ये फिरण्यासाठी सार्वोत्तम (best) समजले जातात.  टोरांटो – कॅलगरी – बँफ – जास्पर – एडमिनटन – (back to) कॅलगरी – टोरांटो अशी आमच्या प्रवासाची रूपरेषा होती.   एडमिनटन हे शहर कॅलगरी च्या उत्तरेला ला आहे आणि या शहरात उत्तर अमेरिकेतील सर्वात मोठा शॉपिंग मॉल आहे.

Route Map - आमच्या प्रवासाची रूपरेषा

Route Map – आमच्या प्रवासाची रूपरेषा

टोरांटो हे कॅनडा देशाच्या पूर्वेला आहे आणि कॅलगरी पश्चिमेला.  अंतर बरंच असल्याने आम्ही टोरांटो ते कॅलगरी विमानाने गेलो.  जवळ जवळ ५ तास लागले आम्हाला.  कॅनडा मध्ये बरीच अशी प्रवासाची ठिकाणं आहेत जिथे कार Rent (भाड्याने) करून फिरणं खूप कॉमन आहे आणि सोयीस्कर देखील आहे.  कारण इथे बऱ्याच शहरात सार्वजनिक वाहतुकीच्या सोयी फारंच कमी आहेत.  तेव्हा आम्ही कॅलगरी विमानतळावरूनच ९ दिवसांसाठी “Budget” (हे car rental service चं नाव आहे) कार भाडयाने घेतली  आणि हॉटेल वर पोहोचलो.  कॅलगरी शहर मला इतर शहरांपेक्षा जरा वेगळं,  शांत वाटलं.  नीरज नेहमी म्हणतो कि एखाद्या जागेचा खरंच अनुभव घ्यायचा असेल तर त्या ठिकाणी पायी फिरलं पाहिजे, तिकडचं लोकल फूड खाल्लं पाहिजे, तिथल्या स्थानिक लोकांसारख त्यांच्यातलच होऊन राहिलं पाहिजे.  म्हणून गाडी हॉटेल मधेच ठेऊन आम्ही पायीच भटकायला निघालो.  आम्हाला बरीच भारतीय लोकं दिसली तिथे आणि भारतीय restaurants पण दिसली.  आम्ही एक वेळ लोकल फूड आणि एक वेळ Indian खाऊन फिरून हॉटेल वर आलो.  कॅलगरी शहरामध्ये बघण्यासारखं तसं खास काही नाही, पण इकडून बँफ राष्ट्रीय उद्यान खूपच जवळ असल्यामुळे आम्ही कॅलगरीत मुक्काम केला.  आमच्या टूर चा अजून एक शेवटचा दिवस आम्ही कॅलगरी फिरायला ठेवला होता.  कारण आमचं परतीचं विमान कॅलगरी वरूनच होतं.  तसं पाहायला गेलं तर एडमिनटन वरूनही टोरांटो साठी आम्ही फ्लाईट बुक करू शकलो असतो, पण कॅलगरी विमानतळावरून (airport) रेंट केलेली कार एडमिनटन ला परत केली तर 3 पट जास्त पैसे मोजावे लागणार होते.  म्हणून आम्ही  ड्राइव्ह करून परत कॅलगरीलाच यायचं ठरवलं.

कॅलगरी शहर

कॅलगरी शहर

आता आमचे डोळे लागलेले ते बँफ आणि जास्पर राष्ट्रीय उद्यानाकडे.  बँफ आणि जास्पर ही रॉकी पर्वत रांगांच्या कुशीत लपलेली पण आकाराने मोठी अशी राष्ट्रीय उद्यानं आहेत. सकाळी लवकर उठून आम्ही बँफ च्या दिशेने निघालो.  कॅलगरी वरून निघालं कि रस्ताच्या दोन्ही बाजूंना सपाट मैदानं आहेत, म्हणजे वाटणारही  नाही कि एक दीड तासात आपण भल्या मोठ्ठ्या पर्वतांच्या इलाक्यात शिरणार आहोत असं.  आता आम्हाला आजूबाजूला बुटक्या बुटक्या टेकड्या दिसायला लागल्या.  आणि एखाद तासाने दूरवर छोटे छोटे डोंगर दिसू लागले.  आणि मनात विचार आला, शेवटी झालं बाबा दर्शन एकदाचं.  इतके दिवस ज्या क्षणाची आम्ही वाट बघत होतो तो क्षण आलाच. हळू हळू आम्ही रॉकी पर्वतारांगांच्या जवळ यायला लागलो आणि माझी excitement अजूनच वाढायला लागली.  सपाट, लांबच लांब मैदानावर अगदी कणखरपणे पाय रोवून हि पर्वतरांग उभी आहे. आणि शेवटी आम्ही पहिल्या वहिल्या पर्वताच्या पायथ्याशी पोहोचलो. अहाहा!! काय दृश्य होतं ते.  भला मोठ्ठा, अगडबंब, करड्या रंगाचा, जणू काही अंगावरच येतोय असा हा अजस्त्र पर्वत, त्यावर अगदी विरळ अशी हिरवी छटा, ती  देखील पायथ्याशी.  मी तर गाडीतून  फोटोच काढत सुटले होते, अगदी एकही angle सोडला नसेल.  पण शेवटी राहवलं नाही आणि आम्ही गाडी बाजूला थांबवली.  तेव्हा  कार रेंट केल्याचं  सार्थक झाल्यासारखा वाटलं.  हवं तिथे थांबावं आणि क्षणभर ते सौंदर्य डोळ्यात साठवून मग पुढच्या प्रवासाला लागावं.  आणि याचा  प्रत्यय आम्हाला आमच्या पुढल्या प्रवासात क्षणोक्षणी आला.

कॅलगरी वरून बँफला जाताना

कॅलगरी वरून बँफला जाताना

"नमस्ते बँफ"

“नमस्ते बँफ”

आम्ही उतरलो तर आमच्या उजव्या बाजूला मोठ्ठ निळशार सरोवर, अगदी निळा रंग दिल्यासारखं आणि डाव्या बाजूला भव्य महाकाय पर्वत, पावसाचं  पाणी भरलेला करडा ढगच जणू.  इतकं आल्हाददायी वातावरण होतं!! आणि काय जोरदार वारा सुटला होता, मस्त!! पहिल्या भेटीतच मी प्रेमात पडले.  मन अगदी भरून गेलं.  मग थोड्या वेळाने पुन्हा गाडीत बसून आम्ही बँफ च्या दिशेने निघालो.  एकदा जे डोंगर सुरु झाले ते संपण्याच नावंच घेत नव्हते .  आणि तलाव तर विचारू नका … शेकडोंनी … या परिसरात खूप नद्या आणि बरेच मोठ मोठाले तलाव आहेत.  प्रत्येक तळ्याचा रंग  वेगळा, एकाचा स्वच्छ आकाशासारखा निळा, तर एकाचा हिरवागर्द, अगदी बहरलेल्या वृक्षासारखा, एक मोरपंखी, तर एक हिरवा निळा पांढरा यांचा मिश्रित रंग.  यालाच म्हणतात ना  “Nature’s Canvas” पुढे पुढे तर दोन्ही बाजूंना पर्वत रांगा,प्रत्येक डोंगराचा रंग वेगळा, उजव्या बाजूला अगदी तपकिरी डोंगर आणि डाव्या बाजूला करडे.  पायथ्याशी हिरव्यागर्द सदाहरित वृक्षांच्या रांगा आणि त्याखालून कधी शुभ्र सफेद तर कधी निळ्या रंगाची नदी वाहतीये.  एक क्षण वाटलं, अजून काय हवं आयुष्याकडून .

मी पाहिलेला सर्वात सुंदर रस्ता - "ट्रान्स कॅनडा हायवे"

मी पाहिलेला सर्वात सुंदर रस्ता – “ट्रान्स कॅनडा हायवे”

हि वाट दूर जाते, स्वप्नामधील गावा

हि वाट दूर जाते, स्वप्नामधील गावा

क्षणभर विश्रांती,निसर्गाच्या कुशीत

क्षणभर विश्रांती,निसर्गाच्या कुशीत

हा डोंगरातून जाणारा रस्ता (ट्रान्स कॅनडा हायवे) तर इतका सुंदर आणि स्वच्छ आहे कि आल्बर्टा सरकारचे खरंच आभार मानायला हवेत.  बँफ राष्ट्रीय उद्यानात जाण्यासाठी प्रवेश शुल्क आहे, पण तो दिल्याचं अज्जिबात दुखः होत नाही, इतका व्यवस्थित बांधला आहे हा रस्ता.  खरं तर राष्ट्रीय उद्यानात रस्ता असणं चुकीचं आहे.  पण या रस्त्यावर बऱ्याच ठिकाणी प्राण्यांना ये जा करण्यासाठी  overpass आणि underpass बनवले आहेत आणि अपघात  टाळण्यासाठी हायवेच्या दोन्ही बाजूंना उंच कुंपणं देखील बांधली आहेत.

साधारण एक तासाने आम्ही या डोंगरांबरोबर बँफ गावात (town) पोहोचलो.  आकाराने तसं छोटं (म्हणजे बाकी कॅनेडीयन मोठ्या शहरांच्या तुलनेत) असलेल्या या गावात एकच मुख्य वर्दळीचा रस्ता आहे.  त्याचं नाव “बँफ अव्हेन्यू” (avenue).  आणि मग बाकी गल्ल्या.  बँफ अव्हेन्यूवर बरीच restaurants, हॉटेल्स, शॉपिंग ची आणि souvenir ची दुकानं आहेत.  म्हणजे  भारतातल्या सिमला  कुलू मनाली मधल्या माल रोड्स सारखं हे बँफ अव्हेन्यू.  इथेच लोकं घुटमळत असतात.  आम्ही पण हॉटेल मध्ये चेक  इन करून फिरायला बाहेर पडलो.  प्रसन्न  सकाळ, लख्खं  सूर्यप्रकाश, आजूबाजूला पर्वत रांगा आणि साधारण २५ अंश सेल्सिअस तापमान, म्हणजे ना थंड ना गरम अशी भटकण्यासाठी एकदम परफेक्ट कंडीशन होती.  आम्हाला बँफ अव्हेन्यू वर फिरता फिरता एक छोटीशी बाग दिसली.  आम्ही त्या बागेत शिरलो.  बागेच्या बाजूने एक नदी वाहत होती आणि तिथे काठावर काही बेंचेस होते.  आम्ही मस्त थोडा वेळ relax झालो आणि  मग जेऊन परत हॉटेल वर आलो.

बँफ अव्हेन्यू

बँफ अव्हेन्यू

DSC_0643 (2) (965x641)दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही “सिल्वरटन फॉल्स” (Silverton Falls) बघायला निघालो.  बँफ मध्ये कुठेही बाहेर पडलात कि रस्त्याच्या दोन्ही बाजूला डोंगर आणि उंच उंच झाडं दिसतात.नाश्ता करून गाडी घेऊन आम्ही निघालो.  सिल्वरटन फॉल्स हा जंगलात आहे आणि तिथे जाण्यासाठी मुख्य रस्त्यावर गाडी ठेऊन मग चालत जंगलातल्या पायवाटे (trail) ने १ ते १.५ किमी  आत जावं लागतं.  आम्ही गाडी पार्क केली.  काहीच गर्दी नव्हती.  जेमतेम २ गाड्या होत्या बाहेर.  आम्ही एका पायवाटेवरून चालू लागलो.  सुरुवातीला तिथे लिहिलं होतं कसं जा ते,  पण नंतर २ वाटा आल्या.  आता झाला ना गोंधळ.  नक्की कुठून जायचं? काहीतरी विचार करून आम्ही उजव्या बाजूची वाट पकडली.  आम्ही चालतोय चालतोय पण कोणीच दिसत नव्हतं.  आमच्या चारही बाजूंना  उंच झाडं होती.  पण सकाळ असल्यामुळे बऱ्यापैकी सूर्यप्रकाश होता.  आणि या बँफ च्या जंगलात ठिकठिकाणी “Bear Warning” (अस्वलांपासून सावधान) चे बोर्ड्स लावलेले असतात. अस्वलांमध्ये Grizzly जातीची अस्वलं खूप मोठी असतात. काही काही ८-१० फूटाची देखील असतात.आणि ती attack करू शकतात. मला तर खूपच भीती वाटायला लागली.  नीरज आपला चालला होता बिनधास्त.  थोडं अंतर गेल्यावर आम्हाला पायवाटेच्या बाजूने पाणी दिसायला लागलं.  मला वाटलं अरे वा आला धबधबा.  पण कसलं काय ! आमच्या सुपीक डोक्याने चुकीची वाट पकडली होती.  ज्या ठिकाणी आम्ही पोहोचलो तिथे धबधबा संपत होता आणि त्याचं पाणी वरून पडतंय असा फक्त आवाज येत होता, धबधबा दिसतंच नव्हता.  पण बाजूने पाणी वाहत होतं, छोटाश्या नदी सारखं. मग नीरज ती छोटीशी नदी पार करून पलीकडे गेला, जेणेकरून त्याला बघता येईल कि पाणी कुठून पडतंय.  आणि फोटो काढत बसला.  मला दिसतच नव्हता तो.  मी आपली हाका मारत बसले.  मला टेंशन आलं, अस्वल आलं तर काय करू!!! हे हे.

आम्ही आल्या वाटेने परत जायला लागलो, तर तिथे अजून एक छोटीशी वाट दिसली आणि ३ जणं दिसले, त्यांना आम्ही विचारलं, आणि मग त्यांनी सांगितलेल्या वाटेने वर जायला लागलो.  ह्या वाटेवर बऱ्यापैकी चढ होती.  आणि शेवटी चढत चढत धबधबा जिथे पडतो तिथे आम्ही पोहोचलो.  आता माझी भीती जरा कमी झाली होती.

बँफ ला जाईपर्यंत मला अस्वलाची भीती कधीही वाटली नव्हती.  वाटायचं कि अस्वल खूप क्यूट असतं.  गोंडस टेडी बेअर सारखं वगैरे, फक्त गुदगुल्या करतं.  पण सगळ्या गुदगुल्या भीतीने बाहेर निघाल्या.  इकडच्या जंगलाचा राजाच अस्वल आहे आणि लोकं त्याला घाबरतात.  आणि आता मी हि.

'पलभर कि जुदाई' करणारी हिच ती Silverton Falls ची छोटीशी नदी

‘पलभर कि जुदाई’ करणारी हिच ती Silverton Falls ची छोटीशी नदी

सिल्वरटन फॉल्स (Silverton Falls) video.

आता आमचं Next Destination होतं “लेक लुइस” (Lake Louise).  गाडी घेऊन आम्ही निघालो.  आणि मी मघाशी म्हटल्या प्रमाणे स्वतःची गाडी असल्यामुळे आम्ही बऱ्याच ठिकाणी थांबत थांबत आरामात चाललो होतो.  जरा फोटोजेनिक डोंगर दिसला कि थांबा, चांगला view असेल तर थांबा, नदीच्या पाण्याचा रंग वेगळा दिसला तर थांबा, असं चाललं होतं आमचं.  जाता जाता Castle cliff, Storm Mountain, Morant’s curve अशा बऱ्याच ठिकाणी आम्ही थांबलो.  आणि जशी जशी बर्फाने आच्छादलेली पर्वतांची शिखरं दिसायला लागली तशी तशी माझी excitement खूपच वाढायला लागली.  थोडं दूर वर एक खूपच बर्फ असलेला डोंगर दिसायला लागला. मी नीरजला म्हणाले मला त्या डोंगराजवळ जायचंय.  बँफ मध्ये तुम्ही खरंच असं म्हणू शकता कारण रस्तेच असे आहेत कि तुम्ही हवा तो डोंगर जवळून बघू शकता.  आणि आम्ही त्या डोंगराच्या दिशेने जायला लागलो.  आणि बघतो तर काय लेक लुइस आणि त्या डोंगराजवळ जायचा रस्ता एकच होता.  आणि मज्जा म्हणजे तो लेक लुइस च्या मागचाच डोंगर होता.

गाडी पार्क करून आम्ही तलावा जवळ जायला लागलो.  बाहेरून अज्जिबात कळत नाही कि हे तलाव कुठे आहे कसं दिसत, लहान आहे कि मोठं.  आणि मग अचानकच समोर बर्फाने अच्छादलेला डोंगर, त्याच्या दोन्ही बाजूला करड्या रंगाचे डोंगर आणि या “C” आकारात लेक लुइस अगदी नीलम खड्यासारख बसलंय.  हा पाण्याचा हिरवट निळा रंग आमच्या महागड्या कॅमेऱ्याला देखील टिपता आला नाही.  खूपच वेगळं दृश्य आहे हे. लेक लुइसचं पाणी बऱ्यापैकी थंड होतं आणि ते ब्लू लगून मध्ये थोडं दूध मिसळल्यासारखं दिसत होतं.  काय पण उदाहरण आहे.  असो मग आम्ही तळ्याच्या काठी थोडा वेळ बसलो, आजूबाजूला फिरलो आणि अनपेक्षितच आम्हाला तिकडे एक एडमिनटन मधील मराठी कुटुंब भेटलं.  त्यांनी आम्हाला  लगेच फोन नं.वगैरे देऊन घरी येण्याचं आमंत्रण देखील देऊन टाकलं.मनात म्हटलं वा! काय जबरदस्त विश्वास आहे ह्यांचा आमच्यावर.  मला तर फारंच आवडलं..पण एकच किंतु राहिलं मनात कि निळं आभाळ काही दिसलं नाही आम्हाला, तेव्हा  आम्ही ठरवलं कि परत येऊ लेक लुइस वर निळ्या आकाशाखाली हे बर्फाचे डोंगर आणि नीळ पाणी कसं दिसतं ते बघायला.

सृष्टी मंदिरातील भगवंताचं पहिलं वहिलं दर्शन

सृष्टी मंदिरातील भगवंताचं पहिलं वहिलं दर्शन

“लेक लुइस” on the Rocks

“लेक लुइस” on the Rocks

संध्याकाळ हळू हळू डोकं वर काढायला लागली आणि मनात विचार आला, की माणसाचं मन किती हावरं असतं नाही.  कितीही मिळालं तरी अजून हवंच असतं…

लेक लुइस (Lake Louise) video.

 To be continued … click here for the next part.


Like what you've read? Click here to get our articles delivered to your inbox. 'Like' our Facebook page and help us grow our Facebook community. We share some content exclusively on our Facebook page!

Leave a Comment | Email This Post | Print Print

  • Digg
  • StumbleUpon
  • del.icio.us
  • Facebook
  • Twitter
  • RedditFatal error: Call to undefined function wp_related_posts() in /home/bharar5/public_html/wp-content/themes/prosumer/single.php on line 41