Bharari

Taking Flight…
Subscribe

“रॉकी पर्वतरांग” … पृथ्वीवरील एक स्वर्ग – भाग २

SubscribeFiled Under: Canada, Marathi Articles,by Bhakti

A memoir in Marathi (मराठी) of our week-long road trip in the Canadian Rockies – Heaven on Earth – visiting Banff, Yoho and Jasper National Parks, as well as Calgary and Edmonton in the Province of Alberta.

Click for: Part One | Part Two

आता “एमरल्ड लेक” (Emerald Lake) – नावासारखंच आहे अगदी, एमरल्ड खड्याच्या रंगाचं.  पण तुम्ही म्हणाल कुठे आहे हे आता आणि कसं जायचं या तळ्यावर.  लेक लुइस पासून थोड्याच अंतरावर “ब्रिटिश कोलंबिया” (British Columbia) प्रांतात “योहो (Yoho) राष्ट्रीय उद्यान”आहे. या उद्यानातच आहे हे तलाव.  आणि हे योहो राष्ट्रीय उद्यान जास्पर ला जायच्या वाटेवर आहे त्यामुळे लेक लुइस बघून आल्यावर दुसऱ्या दिवशी बँफ मधून आम्ही आमच्या Bags उचलल्या आणि चेक आउट करून निघालो योहो राष्ट्रीय उद्याना च्या दिशेने.  खरतर रॉकी पर्वतरांगांमध्ये फिरायला २ रस्ते आहेत, एक म्हणजे ‘ट्रान्स कॅनडा हायवे’ आणि दुसरा म्हणजे अगदी जंगलाच्या जवळून आतून जाणारा ‘Bow Vally Parkway – Highway 1A’.

हायवे वरून आपल्याला लांबच लांब डोंगररांगा, नद्या, तलाव दिसतात.  थोडक्यात म्हणजे view दिसतो, पण आतल्या रस्त्याने एक वेगळीच मज्जा आहे आणि थ्रील आहे आणि ते म्हणजे जंगलाचा खजिना, wild life.  या रस्त्याने जाताना माझी excitement तर खूपच वाढली होती.  आम्ही बघत बघत चाललो होतो कि काही  दिसतंय का ते.  आणि देवाची कृपा आणि आमच्या नशिबाने आम्हाला वेगवेगळी हरणं, सांबर आणि चक्क काळं अस्वल आणि त्याचं छोटं पिल्लू पण दिसलं.  धन्य वाटलं.

जंगलाजवळून जाणारा ‘Bow Vally Parkway - Highway 1A’

जंगलाजवळून जाणारा ‘Bow Vally Parkway – Highway 1A’

बँफ ते जास्पर अंतर जवळ जवळ ३०० किमी च आहे.  आणि आम्हाला एमरल्ड लेक बघायचं होतं.  तेव्हा योहो राष्ट्रीय उद्यानामधील “फिल्ड” (Field) गावात आम्ही एक दिवस राहण्याचं ठरवलं.  हे गाव लेक लुइस वरून बऱ्यापैकी जवळ आहे.  फिल्ड गावाचं वर्णन करायचं तर २ डोंगरांच्या मध्ये वसलेलं हे गाव, आणि लोकसंख्या साधारण २००.  ह्या २ डोंगरांच्या मधून राष्ट्रीय हायवे जातो, त्याला लागुनच एक नदी वाहते, त्या नदीच्या अलीकडे रेल्वेचे रुळ आणि त्याच्या अलीकडे हे गाव.  आणि गावाच्या पाठीला चिकटून रॉकी पर्वत.  असं एकदम चित्रातल्या सारखं आयडीयल ठिकाणी वसलेलं  आहे हे.  हॉटेल्स पण थोडीच आणि लहान आहेत.  गावात आल्या आल्या त्याचं लोकेशन बघून आम्ही भारावून गेलो.

चेक इन करून आम्ही भटकायला बाहेर पडलो.  फिल्ड च्या जवळच “किकिंग हॉर्स” (Kicking Horse) नदीवर एक नैसर्गिक पूल (Natural Bridge) तयार झाला आहे.  तेव्हा हि निसर्गाची किमया बघण्यासाठी आम्ही मध्ये थांबलो.  किकिंग हॉर्स नदी म्हणजे पांढऱ्या शुभ्र पाण्याचा अतिशय वेगाने वाहणारा स्वच्छंद प्रवाह आहे.  आणि या नदीमध्ये बरेच मोठमोठाले दगड आहेत आणि त्यापासूनच हा नैसर्गिक पूल निर्माण झाला आहे.  थोडा वेळ तिकडे बसून आम्ही निघालो “एमरल्ड लेक”(Emerald Lake) बघायला.

“फिल्ड” गावासमोरील नजारा

“फिल्ड” गावासमोरील नजारा

"किकिंग हॉर्स" नदीवरील नैसर्गिक पूल

“किकिंग हॉर्स” नदीवरील नैसर्गिक पूल

नैसर्गिक पूल (Natural Bridge) video.

रॉकी पर्वतारांगांमधील एक एक तलाव म्हणजे नवनवीन आश्चर्य आहे.  प्रत्येकाचा रंग वेगळा आहे.  आणि थोड्याच वेळात आम्हाला एमरल्ड लेक चं पहिलं वहिलं दर्शन झालं.  एमरल्ड लेक चा रंग हा लेक लुइस पेक्षा बराच वेगळा आहे, पाचू सारखा.  आणि चारही बाजूंनी छोट्या मोठ्ठ्या डोंगरांनी वेढलेल्या या तलावात या डोंगरांच प्रतिबिंब पडत असल्यामुळे हे दृश्य अजूनच लोभसनिय वाटतं.  नीरज म्हणाला आपण या तलावाला प्रदक्षिणा मारायलाच हवी नाहीतर एमरल्ड लेक बघितल्याचं समाधान नाही होणार.  तसं हे तलाव बऱ्यापैकी मोठं आहे.  जवळ जवळ ५ किमी ची पायवाट आहे आणि ती पण झाडा झुडुपातून.  आधीच दुपारचे ३ वाजून गेले होते.  आणि नेहमीप्रमाणे माणसांचा तुटवडा असल्यामुळे कुठेतरी २ एक माणसं दिसली तर दिसली.  आम्ही अर्ध अंतर पोहोचलो आणि तिथे थोडी मोकळी जागा होती.  तिथून एमरल्ड लेक इतकं सुंदर दिसत होतं कि काय सांगू.  नीरज च ऐकलं कि नेहमीच फायदा होतो.  त्याच्या दूर दृष्टीत नेहमीच एक वेगळा angle असतो.  समोरून सगळेच बघतात  पण पलीकडे जाऊन जे सौंदर्य दिसतं ते कोणीच बघितलेलं नसतं.  आणि या गोष्टीचा अनुभव मी बऱ्याच वेळा घेतलाय.

हळू हळू अंधार व्हायला  लागला होता आणि इथेही आपली Bear Warning लावलीच होती त्यांनी.  मग  मी नीरज च्या मागे लागले, लवकर फोटो काढ म्हणून.  त्याला बसायचं होतं निवांत.  पण मग मी म्हणाले त्याला, तू काढत बस फोटो, मी थांबते तुझ्या मागे पहारा द्यायला म्हणजे अस्वल आलं तर लढायला मी एकदम तयार वगैरे…

खरंतर आपला सर्वात मोठा शत्रू म्हणजे आपल्या मनातली भीतीच कि … तो फक्त शांत डोंगराकडे बघून हसत होता.

"एमरल्ड लेक"

“एमरल्ड लेक”

"मी कशाला आरशात पाहू"

“मी कशाला आरशात पाहू”

नीरजच्या विसाव्याचे आणि माझ्या टेन्शन चे चार क्षण :)

नीरजच्या विसाव्याचे आणि माझ्या टेन्शन चे चार क्षण 🙂

"एमरल्ड लेक प्रदक्षिणेतील निम्मा टप्पा"

“एमरल्ड लेक प्रदक्षिणेतील निम्मा टप्पा”

एमरल्ड लेक प्रदक्षिणा (Emerald Lake Hiking) video.

त्या दिवशी फिल्ड मध्ये मुक्काम करून दुसऱ्या दिवशी आम्ही जास्पर च्या दिशेने निघालो.  फिल्ड ते जास्पर रस्ता हा सौंदर्याचा लेणं लाभलेला बाप्पाच्या खाजिन्यातला जसा काही एक हिराच आहे.  हा प्रवास इतका “happening” आहे कि प्रवासाचा क्षीण असा काही प्रकार असतो, हे देखील आम्ही विसरून गेलो.  प्रत्येक थोड्या थोड्या अंतरावर काही तरी खास बघायला मिळतं.

जास्पर च्या वाटेवर असलेला “टकाकाव्ह फॉल्स” (Takakkaw Falls) आम्हाला  बघायचा होता.  हा धबधबा कॅनडा मधील दुसरा सर्वात उंच धबधबा आहे.  या धबधब्यापर्यंत पोहोचायला पार्किंग पासून थोडं चालत जावं लागतं.  आणि जसं जसं धबधबा जवळ येत होता, तसं तसं अंगावर मस्त थंडगार तुषार उडत होते.  सुंदर! दिवसाची सुरुवात कशी प्रसन्न झाली.

आम्हाला तिथून अजून एका ठिकाणी जायची इच्छा होती, ती म्हणजे “लेक लुइस गोंडोला” (Lake Louise Gondola).  गोंडोला म्हणजे रोपव्हे.  साधारण २००० मीटर उंचीवर ह्या रोपव्हे (ropeway) ने जायचं आणि या ठिकाणाहून सर्वात उंच असे बरेच पर्वत दिसतात.  हि एवढी लांब पसरलेली पर्वत रांग आहे कि डोळ्यांच्या कोनांत मावत देखील नाही.  इथे एक छोटंसं museum देखील आहे.  पण या रोपव्हे मधून प्रवास करताना मुख्य आकर्षण म्हणजे खाली आपल्याला Grizzly जातीची अस्वलं दिसू शकतात.  त्यामुळे आमची  नजर सतत त्यांना शोधत होती.  बराच वेळ आम्हाला काहीच दिसत नव्हतं.  पण आम्ही आशा सोडली नाही आणि शेवटी खूप दूरवर एक तपकिरी रंगाचं अस्वल दिसलंच.  पण ते इतकं दूर होतं कि त्याचा फोटो पण नीट आला नाही.  पण निदान दिसल्याचं तरी समाधान.

वाटतंय की नाही हे चित्रासारखं!

वाटतंय की नाही हे चित्रासारखं!

“लेक लुइस गोंडोला”

“लेक लुइस गोंडोला”

तिकडून निघून पुन्हा आधी म्हटल्याप्रमाणे निळ्या आकाशाखाली लेक लुइस पाहण्यासाठी आम्ही निघालो.  लेक लुइस ला गेलो.  पण आमच्या नशिबाने आज सकाळी देखील मेघराज होतेच डोंगरांच्या सिंव्हासनावर बसलेले.  पण आम्ही वाट बघितली आणि शेवटी भूक लागली म्हणून तिकडे जवळच एका restaurant मध्ये नाश्ता केला.  आणि म्हटलं उगीच फेरी झाली की.  हॉटेल बाहेर पडलो, गाडीत बसलो आणि जास्पर च्या हॉटेल चा पत्ता GPS मध्ये टाकला.  आणि … मी आणि नीरज दोघांनी एकमेकांकडे बघितलं … आणि परत लेक लुइस! तिसऱ्यांदा! आणि शेवटी देवाने आमची इच्छा पूर्ण  केलीच. ढगांचा शुभ्र पडदा बाजूला झाला आणि निळ्याशार आभाळाचं दर्शन झालंच…

निळ्या नभाखाली "लेक लुइस"

निळ्या नभाखाली “लेक लुइस”

जास्पर ला जाताना

जास्पर ला जाताना

लेक लुइस (Lake Louise) video.

एव्हाना खरं तर आम्ही जास्पर च्या अर्ध्या वाटेवर पोहोचायला हवं होतं.  पण म्हणलं ठीक आहे.  परत येऊ कि नाही माहित नाही.  तेव्हा ज्या इच्छा आहेत त्या आत्ताच पूर्ण करूया.  आणि तेच करून आम्ही निघालो. लेक लुइस वरून जास्पर ला जाण्यासाठी “आइसफिल्ड्स पार्कव्हे” (Icefields Parkway) हा रस्ता घ्यावा लागतो.  जास्पर ला जाताना वाटेत एक “मिस्टाया कॅनीयन” (Mistaya Canyon) (महानिदरी) आहे.  Canyon म्हणजे नदीच्या पत्रात खूप मोठमोठे खडक असतात आणि त्यांच्या मधून नदीच्या प्रवाहाने रस्ता बनवलेला असतो.  .हे नदीचं पाणी त्या खडकांवर उभा राहून आपण बघू शकतो.  जरा वेगळा अनुभव.  असं हे मिस्तया कॅनियन बघून आम्ही निघालो.

आता या पुढचा रस्ता समुद्र सपाटीपासून वर वर जायला लागला.  घाटच होता तो.  असंच जाता जाता एके  ठिकाणी काही बस (buses) आणि लोकं थांबलेली दिसली.  मग आम्ही पण थांबलो. म्हटलं बघूया तरी काय आहे ते आणि गाडी पार्क करून ती लोकं जिथे जात होती त्यांच्या मागे मागे गेलो.  प्रचंड वारा आणि बोचरी थंडी होती.  आजूबाजूचे सगळे डोंगर सारखेच.  झाडं वगैरे काहिही नव्हतं. एक छोटीशी टेकडी चढून एका सपाट जागी आम्ही पोहोचलो आणि समोर पाहतो तर काय … भलं मोठ्ठं glacier “अथाबास्का ग्लेशिअर” (Athabasca Glacier)!  म्हणजे बर्फाची प्रचंड मोठी लादी.  पण फक्त जरा मळलेली होती, शुभ्र सफेद नाही.  जो बर्फ आपण डोंगरावर बघतो तो आपल्या १ फुटावर.  इतकं वेगळं feeling होतं ते.  कारण ते सगळं अचानक होतं. Unplanned. बराच वेळ ग्लेशिअर जवळ थांबून आम्ही निघालो.

"अथाबास्का ग्लेशिअर" बर्फाची प्रचंड मोठी लादी

“अथाबास्का ग्लेशिअर” बर्फाची प्रचंड मोठी लादी

छोटी टेकडी चढून आल्यावर समोर "अथाबास्का ग्लेशिअर"

छोटी टेकडी चढून आल्यावर समोर “अथाबास्का ग्लेशिअर”

आणि असंच धबधबा दिसला की थांब, थोडा जास्त बर्फ दिसला की थांब, चांगलं दृश्य असेल तर थांबून फोटो काढ, असं करत करत संध्याकाळपर्यंत आम्ही जास्पर ला पोहोचलो.

जास्पर गाव दिसायला थोडं फार बँफ सारखंच आहे पण त्याही पेक्षा शांत आहे.  आम्ही चेक इन केलं.  आमच्या रूम मध्ये स्वयंपाकघर सुद्धा असल्यामुळे मी विचार केला की इतके दिवस बाहेरचंच खातोय.  तेव्हा आज मस्तं काहीतरी बनवूया.  आधीच अंधार व्हायला लागला होता.  म्हणून आम्ही लगेच भाज्या, मसाले वगैरे आणायला बाहेर पडलो.  हॉटेल च्या manager ला विचारलं की इकडे भाजीपाला आणि वाण्याचं दुकान (grocery shop) कुठे आहे.  आणि धावत दुकानात पोहोचलो.  आणि आश्चर्य म्हणजे आम्हाला सगळे भारतीय पदार्थ मिळाले. अगदी मसाल्यापासून, भाज्यांपर्यंत.  फक्त तेलाची छोटी बाटली नव्हती.  मग मी बटर घेतलं.  तांदूळ आणि  डाळ पण मिळाली.एक ब्रेड  घेतला आणि घरी येउन मस्त वरण, भात आणि पोळी नाही पण ब्रेड भाजी असा मस्त बेत झाला आज.  मज्जा आली.

दुसऱ्या दिवशी जरा उशीराच जेवून  “मलिग्ने कॅनीयन” (Maligne Canyon) बघण्यासाठी आम्ही निघालो.  आज माझा वाढदिवस होता.  म्हणजे अजूनच खास दिवस.  मलिग्ने हे रॉकी पर्वतातील सर्वात खोल कॅनीयन पैकी एक  आहे.  मेडिसिनल तलावापासून निघालेल्या मलिग्ने नदीचं हे पाणी या कॅनीयन मधून अथाबास्का (Athabasca) नदीला मिळतं आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे या मलिग्ने नदीचं बरंचसं पाणी जमिनीखाली असलेल्या गुहांमधून वाहतं.  हे कॅनीयन बघायला मात्र बरीच गर्दी होती.  खूप मोठ्ठा परिसर आहे हा.  अगदी जमिनीलगत वाहणाऱ्या नदीपासून वर उंचावर आपल्याला जाता येत आणि इथे एकूण ६ पूल (bridges) आहेत.  काही पूल नदीवर आहेत तर काही वर उंच दगडांवर.  त्यापैकी एका पुला जवळ च्या पार्किंग लॉट मध्ये गाडी पार्क करून आम्ही चालू लागलो.  ब्रिज वरून पलीकडे गेलो आणि हळू हळू तो रस्ता उंच उंच होत गेला.  आणि मग कॅनीयन दिसायला लागले आणि त्याचं खालून वाहणारं पाणी.  आवाज तर जोरदार होता, अगदी खळखळत, आपटा आपटी करत जाणारं हे पाणी बघून असं वाटलं की चुकून जर आपण यात पडलो तर वाहत जायला देखील जागा नाही, कुठेतरी अडकून बसू.  हिवाळ्यात तर म्हणे हे सगळं पाणी गोठतं आणि लोकं खास या बर्फावर चालण्यासाठी मलिग्ने ला येतात.  आत्ता आम्ही खालून वाहणारं पाणी, वरून बघत होतो पण ह्या अति निमुळत्या,उंच खडकांमधील वाटेतून वाहणाऱ्या पाण्यावरून (बर्फावरून) चालण्याचा अनुभव खूपच थरारक असेल. May be next time.

मलिग्ने कॅनीयन

मलिग्ने कॅनीयन

आम्ही फिरता फिरता कॅनीयन च्या दुसऱ्या टोकाला पोहोचलो.  तिकडे दुसरं पार्किंग लॉट होतं.  आणि इथे एका बोर्ड वर एका पायवाटे (trail) चा नकाशा (map) दिला होता.  डाव्या बाजूच्या डोंगरावरून गोल फिरून परत आमच्या पार्किंग लॉट पर्यंत ती ट्रेल होती.  आम्ही म्हणलं चला. या ट्रेल वर मात्र कोणीच नव्हतं.  सगळे आपले त्या कॅनीयन जवळ घुटमळत होते.  मी नीरज ला म्हणाले कि अरे इकडे कोणीच का दिसत नाहीये? आता याचं उत्तर नीरज कसं देणार होता ? पण आपल्याला काही समजत नसेल तर एकतर Google (गूगल) ला नाहीतर नीरज ला विचारा असं कहिसं झालंय.  असो पण आजूबाजूच्या झाडांवर व्यवस्थित directions होत्या.  संध्याकाळ व्हायला अजून ३ एक तास होते.  भरपूर वेळ होता आमच्याकडे. थोडा आवाज करत, गाणी म्हणत आम्ही जात होतो.  म्हणजे एकटं वाटणार नाही म्हणून.  या ट्रेल मधून views खूप छान आहेत.  कारण आपण झाडा झुडुपातून बाहेर आल्यामुळे आपल्याला लांबचे पर्वत दिसतात.

आता थोडं अंतर गेल्यावर उतरण सुरु झाली. आणि नेहमीप्रमाणे त्या उतरणीच्या शेवटी २ रस्ते होते.  हे कम्बख्त २ रस्ते आयुष्यात किती वेळा येणार आहेत काय माहित.  पण नशिबाने दोन्हीकडे काहीतरी अक्षरं लिहिली होती, एका बाजूला 7h, दुसऱ्या बाजूला 7g.  या आधीच्या सगळ्या पाट्या व्यवस्थित होत्या.  ह्याच पाट्यांनी कुठे मार खाल्ला काय माहित. पण आम्हाला आठवलं कि आमचं पार्किंग उजव्या बाजूला होतं.  म्हणून थोडं थांबून आम्ही उजवीकडील वाट पकडली.  आणि उतरायला लागलो.  म्हटलं आत्ता येईल मग येईल.  पण आम्ही येताना जो पूल पार केला होता तो काही दिसतच नव्हता. साधारण साडेचार वगैरे वाजले असतील.  आता आमच्या डाव्या बाजूने नदी वाहत होती.  म्हणजे आम्ही पूर्ण खाली उतरलो होतो.  आणि नदीच्या पलीकडे काही घरं दिसत होती.  आधी बघितल्यासारखी तरी वाटत नव्हती.  म्हटलं नदी जशी वाह्तीये त्याच दिशेने आपण जाऊ.  कारण परत कुठे जायचं आता.  आधीच खूप अंतर आलो होतो आम्ही.  आमच्या उजव्या बाजूला जंगल होतं आणि सगळीकडे कुंपण लावलं होतं ७ एक फुटाचं.  आम्ही मुद्दाम थोडा आवाज करत चाललो होतो.  कोणीही नव्हतं तिथे, म्हटलं काय मूर्खपणा आहे हा.  थोडं अंतर गेल्यावर पाहतो तर काय , कुंपण गायब!!.  ह्याला काय अर्थ आहे, कसली लोकं आहेत हि!! बऱ्यापैकी शांतता होती तिथे, फक्त नदीचा काय तो आवाज आणि थोडाफार आमच्या चालण्याचा.  जंगलात ती अगदी बुंध्यापर्यंत कापलेली झाडं तर अगदी grizzle अस्वलासारखी दिसत होती, केवढे ते भास!  आणि अचानक मागून जोरात धावत कोणीतरी आलं.  आम्ही दोघांनी एकदम मागे वळून बघितलं … तर … एक उंच गोरा माणूस.  असले घाबरलो आम्ही.  आम्हाला घाबरलेला बघून तो म्हणाला “Relax!” आणि आमच्या मधून धावत धावत पुढे निघून गेला.  जोग्गिंग चे शूज आणि shorts (छोटी पँट) घालून तो त्या जंगलात धावत होता.  मला तर attack  च आला असता. त्याला पण आत्ताच यायचं होतं असं धावत.  पण त्याला बघितल्यावर वाटलेली भीती, तो माणूस, “अस्वल” नव्हता, म्हणून कमी झाली. आणि या सगळ्या गोंधळात त्याला रस्ता विचारायचं डोक्यात येईपर्यंत हा माणूस गायब.  आणि आमच्या डोक्यात एकदम प्रकाश पडला कि अरे आपल्याकडे GPS आहे.  कदाचित त्याला रस्ता सापडेल.  आणि धन्य ते GPS! त्याने आम्हाला सांगितलं कि आम्ही बरोब्बर विरुद्ध दिशेने जात होतो.  आणि शेवटी GPS रावांनीच आम्हाला मार्गाला लावलं … GPS बाबा कि जय!

असा अविस्मरनिय वाढदिवस साजरा झाला आमचा (आदरार्थी एकवचन).  मला वाटतं, मी या आधी ट्रेकिंग वगैरे खूप केलं नसल्यामुळे माझ्यासाठी हे सगळं खूप थरारक होतं.  पण माझा अनुभव असा आहे कि ज्या गोष्टी करताना आपल्याला खूप भीती वाटलेली असते, त्याच गोष्टी आयुष्यभर लक्षात राहतात.  नीरज तर ट्रेकर आहे.  त्यामुळे त्याला या सगळ्याची किंव्हा यापेक्षाही बऱ्याच पटीने जास्त थ्रिल्स ची सवय आहे.  पण … तो माणूस जेव्हा धावत आला तेव्हा … हा हा … नीरज पण घाबरलाच!

श्रमपरिहार

श्रमपरिहार

तिथून निघून वाढदिवसाची संध्याकाळ आम्ही मस्त एका तळ्यावर बसून सगळं आठवत, गप्पा मारत आणि स्वतःवरच हसत घालवली.

दुसऱ्या दिवशी जास्पर गाव (town) फिरून आम्ही एडमिनटन च्या दिशेने निघालो.  रस्त्यात आम्हाला रानटी मेंढ्यांचा कळप दिसला.  सगळ्या गाड्या थांबल्या होत्या.  मज्जा आली.  आणि असाच प्रवास करत हळू हळू कधी पर्वतांचे डोंगर, डोंगरांच्या टेकड्या आणि टेकड्यांचे सपाट रस्ते  झाले ते कळलंच नाही आणि आम्ही संध्याकाळपर्यंत एडमिनटन शहरात पोहोचलो.  खूपच वेगळं वाटत होतं.  डोंगर बाबाची कुशी गायब झाली आणि वर मान करून बघायला समोर कोणीच नव्हतं.

एडमिनटनला संध्याकाळी पोहोचल्यामुळे त्या दिवशी काहीच फिरणं झालं नाही.  थोडंफार हॉटेल च्या आजूबाजूला भटकलो आणि जेवून हॉटेल वर आलो.

दुसऱ्या दिवशी आम्ही उत्तर अमेरिकेतील सर्वात मोठा शॉपिंग मॉल –“वेस्ट एडमिनटन मॉल” बघायला गेलो.  खरंच खूप मोठा आहे हा मॉल. इथे aquarium, indoor ice skating, indoor water park, galaxy land आणि मुलांसाठी अजून बऱ्याच प्रकारचे खेळ आहेत. आम्ही अर्धा दिवस मॉल मध्ये थांबून परतीच्या प्रवासाला लागलो.  एडमिनटन ते कॅलगरी प्रवास तर खूपच कंटाळवाणा आहे.  साधारण ४ तासाचं ड्रायविंग आहे.  पण आधी म्हटल्याप्रमाणे आम्ही भाड्याने घेतलेली गाडी एडमिनटन विमानतळावरच परत केली असती तर ३ पटीने जास्त पैसे भरावे लागणार होते.  त्यामुळे आम्ही मुकाट्याने कॅलगरी वरून विमान बुक केलं होतं.  जास्तं नखरे नाहीत. दुसऱ्या दिवशी पहाटेचं विमान होतं आमचं.  आणि दुपारपर्यंत back to टोरांटो..

“वेस्ट एडमिनटन मॉल" मधील Indoor Water Park

“वेस्ट एडमिनटन मॉल” मधील Indoor Water Park

“वेस्ट एडमिनटन मॉल"

“वेस्ट एडमिनटन मॉल”

अजूनही माझ्या डोळ्यांसमोर तो एक न एक क्षण आहे.  हे सगळं लिहिताना खरंच ते ९ दिवस मी जगत होते.  हीच तर मज्जा आहे शब्दांची.  आपल्याला वेगळ्याच जगात घेऊन जातात हे शब्द.  आणि रॉकी पर्वतारांगां मधले ते ९ दिवस तर मला पुन्हा पुन्हा जगावेसे वाटतील.

धावत्या आयुष्यात क्षणभर जगण्याचा प्रयत्न … एक वेगळीच मजा … एक वेगळाच अर्थ.


Like what you've read? Click here to get our articles delivered to your inbox. 'Like' our Facebook page and help us grow our Facebook community. We share some content exclusively on our Facebook page!

Leave a Comment | Email This Post | Print Print

  • Digg
  • StumbleUpon
  • del.icio.us
  • Facebook
  • Twitter
  • RedditFatal error: Call to undefined function wp_related_posts() in /home/bharar5/public_html/wp-content/themes/prosumer/single.php on line 41