Bharari

Taking Flight…
Subscribe

विवा मिहीको! (Viva Mexico!) – भाग २

SubscribeFiled Under: Export, Marathi Articles, Mexico,by Bhakti

Write-up in मराठी (Marathi) of our week-long trip to the most populous city in North America – Mexico City – where we managed to get around without taking a single taxi and having no knowledge of Spanish!

Click for: Part One | Part Two

मेक्सिको शहरातील आणखी एक आकर्षण म्हणजे “झोचीमिलो” (Xochimilco). UNESCO ने प्रसिद्ध केलेल्या World Heritage Site च्या यादीत या जागेचा समावेश आहे. मेक्सिको मध्ये पूर्वी “एझटेक”(Aztecs) नावाची जमात होती, त्यांच्या “नाहूआटल” (Nahuatl) भाषेत “झोचीमिलो” म्हणजे “फुलांची बाग”. पूर्वी या झोचीमिलो तलावात पाण्यावर तरंगणाऱ्या फुलांच्या बागा होत्या म्हणे. आणि काही काळाने या एझटेक लोकांनी इथे पाण्यावर तरंगणाऱ्या शेतीची लागवड सुरु केली. आणि लोकांच्या उदरनिर्वाहाचं ते एक साधनच झालं. मग हळू हळू या शेतीपासून उत्पादित मालाची ने आण करण्यासाठी त्यांनी या भागात कालवे बांधले. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर झोचिमिलो हे प्राचीन मेक्सिकन जीवनपद्धतीचा साक्षीदारच आहे. परंतु आता हे चित्र पूर्णपणे पालटलं आहे. नव्या पिढीचं लक्ष शेतीकडून पर्यटनाकडे केंद्रित झालं आहे. कालवे तसेच आहेत परंतु त्यांचा काही भाग पर्यावरण संवर्धनासाठी आणि पर्यटन वृद्धीसाठी राखीव ठेवला आहे. आणि पर्यटकांसाठी लाकडाच्या रंगीबेरंगी होड्या बनवलेल्या आहेत. ह्या होड्याना “त्रहीनेरास” (Trajineras) असं म्हणतात. तासाच्या हिशोबाने होडी भाडयाने घेऊन मस्त या कालव्यातून फेरी मारता येते. आम्ही देखील बरीच घासाघीस करून ताशी ४०० रुपये असलेली होडी २५० मध्ये पटवली आणि निघालो.

"त्रहीनेरास"(Trajineras) stand

“त्रहीनेरास”(Trajineras) stand

या कालव्याच्या दोन्ही बाजूंना घरं आणि झाडं आहेत. कालव्याची रुंदी फार नाही आणि खोलही नाही. त्यामुळे बाकी पर्यटकांच्या होड्या देखील आपल्या आजूबाजूलाच अगदी जवळ जवळ असतात. या होड्या वल्हवण्याची पद्धत देखील निराळीच आहे. लांबलचक बांबू खाली तळापर्यंत पोहोचतो आणि त्यानेच धक्का देऊन हे होडी पुढे ढकलली जाते. या प्रवासाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे आमच्या आजूबाजूला अनेक लहान होड्यांमधून खाण्यापिण्याच्या गोष्टी आणि विशेषतः निरनिराळ्या प्रकारची दारू विकणारी लोकं फिरत होती. तसंच काही कलाकार मंडळी गिटार, व्हायलीन वाजवून लोकांचं मनोरंजन करत होती (video). अर्थात, फुकट नाही. पण त्यांची होडी आमच्या इतकी जवळ होती कि दुसऱ्या पर्यटकांच्या जीवावर (पैशावर) आमची ऐश चालली होती. तसंच या परिसरात नानाविध प्रकारचे पक्षी पहावयास मिळत असल्यामुळे पर्यटक झोचीमिलो ला पक्षी निरीक्षणासाठी देखील येतात. आमचा नावाडीच आमचा गाईड होता आणि त्याने आम्हाला या जागेबद्दल बरीच माहिती दिली. काय काय सांगत होता तो. पण … आम्हाला त्याचा एक शब्द कळेपर्यंत त्याची ४ वाक्य झालेली असायची. तो शुद्ध स्पानिष मध्ये बोलत होता. आम्ही त्या बिचाऱ्याला एक एक वाक्य चार चार वेळा बोलायला लावत होतो. तो मनात म्हणत असेल कुठून उठून येतात काय माहित. साधं स्पानिश पण येत नाही.

"झोचीमिलो"(Xochimilco)- दारू विकणारी बाई

“झोचीमिलो”(Xochimilco)- दारू विकणारी बाई

तारंगणारं खेळण्यांच दुकान

तारंगणारं खेळण्यांच दुकान

आमचा एक तास कधी भरकन उडून गेला कळलंच नाही. झोचीमिलो ला कलाकुसरीच्या अनेक आकर्षक गोष्टी देखील मिळतात. परंतु घासाघीस केल्याशिवाय काही घेऊ नये कारण पर्यटकांसाठी किमती अवास्तव वाढवलेल्या आहेत. आम्ही देखील थोडी खरेदी करून निघालो रेल्वे स्टेशन कडे. चालता चालता एक जुनं चर्च दिसलं. तिथे घुसलो आणि त्याच्याच बाजूला भाजी मंडई दिसली. म्हटलं बघावं तरी मेक्सिको चं भाजी मार्केट. तुम्हाला खरं वाटणार नाही पण आत घुसल्यावर मला वाटतंच नव्हतं की आपण भारतापासून प्रचंड दूर साता समुद्रा पलीकडल्या उत्तर अमेरिकेतील एका देशात आहोत असं. अगदी मुंबई ठाण्याच्या भाजी मार्केट मध्ये असल्यासारखं वाटत होतं. भाज्या, कांदे, बटाटे इ. मांडून ठेवायची पद्धत देखील तशीच. तिथेच एक कोपऱ्यात एक माणूस ताजे चिकन रोल्स बनवत होता. एक आजोबा तिथे ते रोल्स खात बसले होते. त्यांना अगदी देशपांडे, पाटील, जोशी आजोबा वगैरे हाक मारावी असं वाटण्या इतवर ते महाराष्ट्रीयन दिसत होते. म्हणजे कल्पना करा, स्पानिश बोलणारे मराठी आजोबा. मनात म्हटलं, हे खरं मेक्सिको. आणि मग तिथून रेल्वे पकडून दुसऱ्या एक मोठ्या जॉगिंग पार्क मध्ये गेलो, हे पार्क इतकं प्रचंड मोठं होतं की फिरता फिरता संध्याकाळ झाली. आज खूप चाल झाली आमची. बऱ्यापैकी दमलो होतो आम्ही.

"झोचीमिलो" चं भाजी मार्केट

“झोचीमिलो” चं भाजी मार्केट

कोण या आजोबांना मेक्सिकन म्हणेल? हे तर टिपिकल मराठी आजोबा!

कोण या आजोबांना मेक्सिकन म्हणेल? हे तर टिपिकल मराठी आजोबा!

मेक्सिको शहरातील प्रथम क्रमांकाचं पर्यटन स्थळ म्हणजे “थीओथीकॅन पिरामिड्स” (Teotihuacan Pyramids). दरवर्षी लाखो लोकं ही पिरामिड्स बघायला येतात. या जागेचा देखील UNESCO च्या यादीत समावेश आहे. थीओथीकॅन म्हणजे “देवांची वस्ती” किंवा “जिथे मनुष्य देव होतात” अशी जागा. थीओथीकॅन ला जगातील तिसऱ्या क्रमांकाच आकाराने सर्वात मोठ पिरामिड आहे. इथे जाण्यासाठी tourist बस करावी लागते. आम्ही सकाळी लवकर निघून मेट्रो घेऊन “ऑटोबसेस डेल नॉर्टे” (Autobuses Del Norte) या स्टेशन ला उतरलो. स्टेशन मधून बाहेर पडल्यावर Autobuses चा बोर्ड दिसतोच. इथे सगळेच पर्यटक येत असल्याने खूप गर्दी होती. आम्ही ८ नं. counter च्या लाईनीत उभे राहिलो. थीओथीकॅन च्या बस चं तिकीट प्रत्येकी ३६ पेसोज होतं म्हणजे आमच्या दोघांचे मिळून ७२ पेसोज. आमचा नंबर आल्यावर आम्ही २ तिकिटं मागितली आणि ५०० ची नोट दिली आणि सुट्टे परत घेऊन निघालो. बस च्या दिशेने जायला लागलो आणि एकीकडे नीरज हिशोब करत होता. दोन तीनदा पैसे मोजले आणि पाहतो तर काय! १०५ पेसोज कमी! हाथचालाखी करून मस्त चुना लावला की त्याने आम्हाला. आम्ही धावत धावत तिकीट counter वर गेलो. आणि मोडक्या तोडक्या भाषेत त्याला सांगितलं तर त्या चालू माणसाने आमचेच १०५ पेसोस लपवून आम्हाला दिले. बाकी काहीही बोलला नाही. sorry देखील नाही. नशीब आमचं नाहीतर स्पानिश मध्ये भांडता देखील आलं नसतं.

आमची बस मात्र एकदम छान, उंची होती. एक तास प्रवास करून आम्ही थीओथीकॅन ला पोहोचलो. थीओथीकॅन बघायला ५१ पेसोज प्रवेश शुल्क आहे. हा परिसर बराच मोठा असल्याने इथे अनेक प्रवेश द्वारं आहेत. आम्ही ज्या गेट मधून आत शिरलो, तिथून दूरवर एक पिरामिड सारख्या आकाराचं काहीतरी दिसलं. पण ते पिरामिड नव्हतं. ते होतं “टेम्पलो दे क्वेटझालकॉटल” (templo de quetzalcoatl). क्वेटझालकॉटल म्हणजे “पिसारी सर्प”. या देवळात इ.स. पूर्व पहिल्या शतकात म्हणे पहिल्यांदाच पिसारी सर्पाची पूजा केली गेली. हा पिसारी भुजंग dragon सारखा दिसतो. पिरामिड सारख्या दिसणाऱ्या या देवळावर हे पिसारी सर्प कोरलेले आहेत. DSC_0593 (858x570) देवळाच्या डाव्या बाजूने एक रस्ता जातो. तो थेट “पिरामिड ऑफ सन” (Pyramid of Sun) पर्यंत आणि पुढे हाच रस्ता “पिरामिड ऑफ मून” (Pyramid of Moon) पर्यंत आपल्याला पोहोचवतो. या रस्त्याचं नाव आहे “अव्हेन्यू ऑफ द डेड” (Avenue of the Dead). रस्त्याच्या दोन्ही बाजूला आकाराने लहान अशी इतरही अनेक पिरामिड्स आहेत. पण “पिरामिड ऑफ सन” हे सर्वात प्रमुख आणि जगातील तिसरं सर्वात मोठ पिरामिड आहे. “पिरामिड ऑफ सन” ची बांधणी साधारण इ. स. १०० व्या शतकात पूर्ण झाली. या पिरामिड ची उंची साधारण २४६ फूट म्हणजेच ७५ मीटर आणि विस्तार ७३८ फूट (२२५ मीटर) इतका आहे. पिरामिड च्या खाली म्हणे एक पवित्र गुहा आहे जी आपल्याला आत्मिक विश्वाकडे घेऊन जाते. आणि ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे थीओथीकॅन मधील सर्व पिरामिड्स ना पायऱ्या आहेत आणि त्याही अगदी शिखरापर्यंत. त्यामुळे पिरामिड च्या अगदी टोकापर्यंत आपण चढून जाऊ शकतो. पण त्यासाठी बरीच मोठी रांग होती. मग आम्ही देखील रांगेचा मान सगळ्यांना या तत्वाने मुकाट्याने रांगेत उभं राहून पिरामिड चं दर्शन घेऊन आलो. हे संपूर्ण बांधकाम माती आणि दगडाने केलेलं आहे. थीओथीकॅन चा परिसर  चारही बाजूंनी डोंगरांनी वेढलेला आहे. आणि हि पिरामिड्स म्हणजे डोंगर खोऱ्यात वसलेल्या, मेक्सिकोत फार पूर्वी असलेल्या “मायन” संस्कृतीचे अवशेष आहेत. परंतु थीओथीकॅन शहर मूळात वसवलं कोणी या बाबतीत अनेक वाद-विवाद आहेत. थोडक्यात सांगायचं झालं तर मेक्सिकोवर युरोपियन साम्राज्य येण्याच्या अनेक शतकं आधी प्राचीन संस्कृतींनी हे थीओथीकॅन शहर आणि हि पिरामिड्स वसवली आहेत, असं उत्खनन शास्त्रज्ञाचं मत आहे. “पिरामिड ऑफ सन” बघून त्याच “अव्हेन्यू ऑफ डेड” रस्त्याने डाव्या बाजूने चालत चालत आम्ही “पिरामिड ऑफ मून” ला पोहोचलो. “पिरामिड ऑफ मून” ची बांधणी साधारण इ. स. २०० ते ४५० मध्ये पूर्ण झाली. या परिसरात मायन संस्कृती दर्शवणाऱ्या अनेक शोभेच्या वस्तू विकायला आहेत. पण प्रचंड bargaining करावं लागतं.

"पिरामिड ऑफ सन" (Pyramid of Sun)

“पिरामिड ऑफ सन” (Pyramid of Sun)

"अव्हेन्यू ऑफ द डेड" (Avenue of the Dead)

“अव्हेन्यू ऑफ द डेड” (Avenue of the Dead)

"पिरामिड ऑफ मून" (Pyramid of Moon)

“पिरामिड ऑफ मून” (Pyramid of Moon)

पिरामिड बघण्याचा अनुभव फारच वेगळा होता. म्हणजे उगाच archeology (उत्खननशास्त्र), anthropology (मानवशास्त्र), गूढ मायन संस्कृती वगैरे शब्दांशी आपला संबंध असल्यासारखं वाटयाला लागलं होतं. असो, पण दिवसभर फिरून फिरून दमछाक झाल्यामुळे आज रात्री त्या पिसारी सापाची स्वप्न बघत झोप मात्र छान लागली.

DSC_0807 (858x570)आता आम्हाला आमचं पुढलं पाऊल ठेवायचं होतं ते “मालिनेल्को” (Malinalco) या गावात. पिरामिड, उत्खननशास्त्र या विषयात रस निर्माण झाल्यामुळे असेल कदाचित, पण आम्ही या छोट्याशा गावात असलेल्या “अझ्टेक” संस्कृतीच्या “झोना अर्किओलोजि साईट” (Zona Archeological site) ला भेट द्यायचं ठरवलं. मेक्सिको शहरापासून ११५ कि. मी. वर वसलेल्या या गावात पोहोचणं हेच आपल्यासारख्या (माझ्यासारख्या) स्पानिश येत नसलेल्या लोकांसाठी आव्हान आहे. या जागेला फारशी पर्यटक मंडळी भेट देत नाहीत. पण स्थानिक लोकं मात्र आवर्जून जातात. आम्ही माहिती काढल्याप्रमाणे मेक्सिको ते मालिनेल्को हे २ तासाचं अंतर होतं. मेट्रो ट्रेन घेऊन आम्ही “ऑबजरवेटोरी” (Observatorio) स्टेशन ला उतरून “ओटोबस टर्मिनल पोनिएन्ते” (Autobus Terminal Poniente) ची पाटी शोधत शोधत ETN बस स्थानकावर पोहोचलो.

आमच्या थोर नशिबाने चाल्मा ला पोहोचण्या आधीच या बस मध्ये काहीतरी बिघाड झाला आणि बस काही आता पुढे जाईना. एकतर एवढ्या कष्टाने हि बस हाती लागली होती. मग या बस ड्राइवर ने आम्हाला परत दुसऱ्या कुठल्याशा बस मध्ये बसवलं. आता पुढचा सगळा प्रवास घाटाचा होता. ही बस तर फारच लोकल होती. १०-१० मिनिटांनी थांबत होती. दुपारचे ३ वाजले होते. आम्ही काहीही खाल्लं नव्हतं. म्हटलं आता या पुढलं स्टेशन तरी चाल्मा असेल. आत्ता येईल, मग येईल. एक डोंगर उतरलो, दूसरा चढून उतरलो. चाल्मा काही येईना. हळू हळू बस मधली लोकं कमी व्हायला लागली. आणि आता तर कोणी चढत देखील नव्हतं. एकतर मेक्सिको शहरापासून एवढं दूर आलो होतो आम्ही. मी वीस एक वेळा तरी त्या conductor ला चाल्मा आलं का असं विचारलं असेल. खूपच घाबरले होते मी. घाटाचा रस्ता, आजूबाजूला फक्त झाडं, संध्याकाळ व्हायला लागली होती, driver आणि condutor दोघेही दांडगे, हट्टेकट्टे, त्यांना आमची भाषा येत नाही आणि आम्हाला त्यांची, बस मध्ये फक्त आम्ही दोघंच. देवाचं नाव घेण्यावाचून दुसरा पर्याय तरी काय होता. म्हटलं कुठे घेऊन जातायत हे आपल्याला काय माहित. तो मास्तर मघाशी काय बरं बोलला असेल त्या driver शी? एक नाही हजारो शंकांनी मनात थैमान घातलं होतं. मेक्सिको बद्दलचं मुळातच पूर्वाग्रहदूषित मत, मनात म्हटलं कुठून बुद्धी सुचली आणि त्या मास्टर चं ऐकून या बस मध्ये बसलो. त्या driver आणि conductor च्या हालचालींवर बारीक नजर ठेऊन होते मी. आमची बस घाट उतरत होती, ४ वाजले होते आणि तेवढ्यात काही माणसं रस्त्याच्या बाजूने चालताना दिसायला लागली. हळू हळू अजून काही माणसं दिसायला लागली. आणि अचानक एका चौकात येउन बस थांबली. आणि तो conductor आमच्याकडे बघून हसत म्हणाला “चाल्मा”. मी परत त्याला विचारलं. त्याने हातवारे करून परत आम्हाला सांगितलं “चाल्मा”. स्वर्ग न बघता स्वर्गीय आनंद का काय तो म्हणतात ना तो या क्षणी मी भरभरून अनुभवला. आम्ही driver ला विचारलं “मालिनाल्को” तर त्याने आम्हाला हसतमुखपणे, अगदी व्यवस्थित share taxi ची दिशा दाखवली आणि आम्ही लगेच बस मधून उतरलो. आम्ही योग्य दिशेने जाईपर्यंत तो बस मधून आम्हाला मार्ग दाखवण्याचा प्रयत्न करत होता. आणि आम्ही दिसेनासे झाल्यावर बहुतेक त्याने बस वळवली आणि तिथून निघून गेला.

काही क्षणापूर्वी याच २ माणसांविषयी कुठल्या थरापर्यंत जाऊन मी वाईट विचार केला होता ते माझं मलाच माहित. पण ही माणसं इतकी चांगली निघाली. काहीवेळा आपण काय विचार करत असतो आणि सत्य किती वेगळं असतं नाही. पूर्वग्रहामुळे आपले विचार आणि बुद्धी कसे भ्रष्ट होतात हे मला आज कळलं.

चाल्मा वरून share taxi घेऊन संध्याकाळी आम्ही मालिनाल्को ला पोहोचलो. २ तसाचा प्रवास ७ तास कसा करायचा हे आता आम्हाला व्यवस्थित कळलंय. आणि आज आमच्या लग्नाचा वाढदिवस असल्याने ह्या ७ तासांनी “वो सात फेरे”,”सात जन्म”,”हम साथ(७) साथ(७) हे” वगैरे ची आम्हाला जाणीव करून दिल्यामुळे, ते वाया गेल्याचं दुखः करायचं की सुखरूप पोहोचलो म्हणून आनंदी व्हायचं, अशा द्विधा मनस्थितीत आम्ही हॉटेल वर पोहोचलो.

डोंगरांच्या कुशीत लपलेलं हे मालिनाल्को गाव तसं खूपंच लहान आहे. पण लोकं मात्र अतिशय चांगली, सरळ साधी. सामान्यतः गावांमधली माणसं साधीभोळीच असतात नाही. संध्याकाळी गावात भटकून, एका ठिकाणी जेऊन आम्ही हॉटेल वर परत आलो.

"मालिनाल्को" मधील चर्च

“मालिनाल्को” मधील चर्च

"मालिनाल्को" चे डोंगर

“मालिनाल्को” चे डोंगर

दुसऱ्या दिवशी सकाळी ९ ला आम्ही “Aztec” संस्कृतीचे अवशेष पाहण्यासाठी “मालिनाल्को झोना अर्किओलोजिकल साईट” ला गेलो. आम्हीच आजचे पहिले पर्यटक होतो. इथे देखील ४१ पेसोज इतका प्रवेश शुल्क आहे. सुरुवातीला ६४ पायऱ्या आणि नंतर मुख्य दरवाजातून आत शिरल्यावर मालिनाल्को साईट पर्यंत पोहोचण्यासाठी ३५८ पायऱ्या आहेत. इथे एक विशेष म्हणजे  जागोजागी माहितीपर पाट्या लावल्या आहेत आणि त्या इंग्रजी आणि स्पानिश अशा दोन्ही भाषेत आहेत. मालिनाल्को हे नाव अझ्टेक लोकांच्या नाहुआटल भाषेतील “मालीनाल्ली” (Malinalli) म्हणजे वाळलेलं गवत, औषधी वनस्पती या मूळ शब्दापासून अनुजात आहे. मालिनाल्को च खोरं हे समुद्रसपाटीपासून साधारण १८०० मीटर (५९०२ फूट) उंचीवर आहे. ही जागा साधारण ५०० वर्ष जुनी आहे. आरामात फोटो काढत, त्या पाट्या वाचत आम्ही अर्ध्या तासात वर पोहोचलो. वर पठार आहे. इथे अझ्टेक लोकांच्या घरांचे अवशेष आहेत आणि पिरामिड सारखं दिसणारं एक मुख्य देऊळ आहे आणि त्यात बिबळ्याच तोंड दगडात कोरलेलं आहे. तसं पाहायला गेलं तर एकदा “पिरामिड ऑफ सन” आणि “पिरामिड ऑफ मून” बघितल्यावर ही जागा खूपच लहान वाटते. परंतु मेक्सिकोतील एका छोट्या गावात येण्याचा अनुभवच जास्त महत्वाचा होता. थोडा वेळ आजूबाजूचा परिसर बघून आम्ही निघत होतो तेवढ्यात नीरज ला दूरवर एक गुहा दिसली. आणि बर्यापैकी लांब होती ती. नेहमीप्रमाणे त्याच्या डोक्यात किडा वळवळायला लागला. एकतर तिथे स्पष्ट लिहिलं होता की या परीसारापलीकडे जाऊ नका. तर म्हणे मी लांबूनच बघून येतो आत काय आहे ते. मी मनात म्हटलं, नीरज ला असं लांबून बघता येतं का काही. त्याला जा म्हटलं तर तो आत जाऊनच बघणार. त्याशिवाय चैन थोडंच पडणार आहे त्याला. आणि तिथे जायचा रस्ता देखील सोप्पा नव्हता. छोट्या डोंगराच्या बाजूने पकडून पकडून जायचं. मी त्याला एक खूण सांगितली आणि बजावलं त्या पलीकडे जायचं नाही. नाहीतर मी पण येईन तिथे (ही माझी आवडती धमकी आहे) पण थोडं अंतर गेल्यावर त्याला कळलं की ती गुहा दिसतीये तितकी जवळ नाही. आणि त्यात माझा आरडाओरडा. १५ मिनिटांनी तो परत आला बिचारा.

अझ्टेक लोकांच्या घरांचे अवशेष

अझ्टेक लोकांच्या घरांचे अवशेष

चालला आमचा हिरो

चालला आमचा हिरो

ट्रेक ला जातो तेव्हा काय काय करत असेल देवास ठाऊक. असो तिथून निघून सरळ हॉटेल वर येऊन आम्ही bags उचलल्या आणि परत चाल्मा. एका स्थानिक माणसाने आम्हाला चाल्मा पर्यंत पोहोचण्यासाठी मदत केली. तिथेच चौकात एक मोसंबी रसवाला होता. पण ते मोसंब नव्हतच, ते होतं मोसंबासारखं दिसणारं “चाकोतरा” (grape fruit). एका मुलीने १५ पेसोज देताना बघून मी देखील काही न विचारता तेवढेच दिले. तर त्या प्रामाणिक माणसाने ५ परत केले. तो सहज पर्यटक बघून ५ पेसोज ची वरकमाई करु शकला असता पण मी छोटा ग्लास घेतल्यामुळे १० च पेसोज. अशी असतात गावातली लोकं. आणि तसं बघायला गेलं तर असे लहान अनुभवच आपल्याला मोठी शिकवण देऊन जातात.

ज्यूस पिऊन आम्ही निघालो. यावेळी मात्र आम्हाला थेट मेक्सिको सिटी पर्यंत बस मिळाली. आणि संध्याकाळपर्यंत परत “झोकॅलो” (आठवतंय का?). गावातून एकदम शहरी गजबजाटात. तेच सणाचं वातावरण. आज २९ डिसेंबर. नवीन वर्षाच्या स्वागताची जय्यत तयारी सुरु होती. रात्री १० वाजता आरामात खाऊन पिऊन आम्ही फिरायला बाहेर पडलो. वाटतही नव्हतं की रात्रीचे १० वाजलेत. मी म्हटलं ना, अगदी मुंबई सारखं. फिरता फिरता झोकॅलो चौकात गेलो. तिथेच कोपऱ्यात एक मुलगा सतार सारखं दिसणारं वाद्य वाजवत होतां (video). आणि लोकं त्याच्याभोवती गोळा झाले होते. मेक्सिको सारख्या स्पानिश देशात रस्त्यावर सतार ऐकण्याचा योग येईल असं जन्मात कधी वाटलं नव्हतं मला. त्याचं वाजवून झाल्यावर आम्ही त्याच्याशी थोड्या गप्पा मारल्या .त्याचं कौतुक केलं. तो उरुग्वे चा होता. आम्ही भारतीय आहोत असं सांगितल्यावर तर त्याला अतिशय आनंद झाला. त्याला भारतात जाऊन सतार शिकायची खूप इच्छा होती. त्याला शुभेच्छा देऊन आम्ही तिथून निघालो आणि कॅथेड्रल समोरच्या परिसरात मस्त आरामात फुटपाथवर जाऊन बसलो. गाड्यांसाठी हा रस्ता तसाही बंदच होता. बरीच लोकं बसली होती तिथे. मुलं खेळत होती. काही लोकं शॉपिंग, काही खाणंपिणं, जत्राच होती की (video). असुरक्षित असं काहीच नव्हतं तिथे. निदान आम्हाला तरी जाणवलं नाही. मेक्सिकोत सतत पोलिसांच्या गाड्या फिरत असतात. म्हणजे आपल्याला सतत पोलिसांचं अस्तित्व आपल्या आजूबाजूला जाणवत असतं. एका दृष्टीने ते चांगलं आहे आणि एका दृष्टीने वाईट. पण आमच्या अनुभवाप्रमाणे निदान मेक्सिको शहरात तरी अशी उटसूट, खुल्लमखुल्ला गुन्हेगारी दिसत नाही. प्रोब्लेम्स आहेत आणि असतीलही पण इतकेही नाहीत की तिथे जाणंच टाकावं. आणि अशाच गप्पा मारता मारता १२ कधी वाजले कळलंच नाही. अजूनही तेवढीच गर्दी होती. पण आम्ही निघालो. हि मजा अनुभवता यावी म्हणूनच आम्ही झोकॉलो च्या अगदी जवळचंच हॉटेल बुक केलं होतं. आणि पायीच हॉटेल वर पोहोचलो.

ख्रिसमस ची रोषणाई

ख्रिसमस ची रोषणाई

आज आमचा मेक्सिकोतील शेवटचा दिवस. आज विशेष काही कार्यक्रम नव्हता पण एक जागा बघायची इच्छा होती. ती म्हणजे “पार्क इकोलोजीको दे झोचिमिलो” (Parque Ecologico de Xochimilco). हे पार्क संध्याकाळी ६ ला बंद होतं. आणि आमचा सकाळचा थोडा वेळ शॉपिंग मध्ये गेला. दुपारी घाई घाईत आम्ही मेट्रो आणि नंतर लोकल बस असा प्रवास करून या इकोलोजीकाल पार्क मध्ये पोहोचलो. मेक्सिको शहरातील पांढऱ्या आणि हिरव्या रंगाच्या लोकल बस मध्ये conductor नसतो. चढताना driver लाच सांगायच कुठे जायचं आणि त्यालाच पैसे द्यायचे. तिकीट वगैरे काही नाही. पण पैसे दिल्याशिवाय बसायचं नाही. जरा वेगळीच पद्धत आहे.

मेक्सिकन लोकल बस

मेक्सिकन लोकल बस

DSC_0030 (858x570)असो पण हे पार्क खूपच सुंदर आहे. इथे आपण सायकल किंवा छोटी गाडी तासाच्या हिशोबाने भाड्याने घेऊन हा परिसर फिरू शकतो. चालत फिरायला गेलं तर एक अख्खा दिवस लागेल. बराच मोठा परिसर आहे हा. आम्ही आपल्या १५ -१५ पेसोजच्या २ सायकली घेतल्या आणि निघालो. या पार्क मध्ये कृत्रिम असं काही नाही. सगळाच निसर्ग.  इथे बरीच लोकं पक्षी निरीक्षणासाठी येतात. आम्हाला देखील निरनिराळ्या रंगाचे, आकाराचे अनेक पक्षी दिसले. Explore करण्यासारख्या बऱ्याच जागा आहेत इथे. आमची दुपार एकदम मस्त गेली. अगदी पार्क बंद होईपर्यंत आम्ही आमच्या सायकली घेऊन फिरलो. आणि मग मुख्य दरवाजा बंद झाल्यामुळे शोधत शोधत मागच्या दरवाजाने बाहेर पडलो. आता परत हॉटेल वर जाण्यासाठी बस पकडायची होती. आणि त्याबद्दल आम्ही आधीच चौकशी केली होती. पण परत खात्री करून घ्यावी म्हणून एका मुलाला विचारलं. त्याला कळलं की आम्हाला स्पानिश येत नाही ते. तर त्याने मनापासून प्रयत्न करून तुटक्या फुटक्या इंग्रजीत आम्हाला रस्ता दाखवला आणि कुठली बस पकडायची ते सांगितलं. आणि आम्ही “ग्रासिआस” (thanks) म्हणून निघालो. त्याला काय वाटलं काय माहित. तो धावत धावत परत आला आणि पुन्हा व्यवस्थित हळू हळू आम्हाला सांगितलं. बिचारा, खूपच चांगला होता तो. आणि त्याने सांगीतल्याप्रमाणे बरोब्बर मेट्रो स्टेशन ला आम्ही पोहोचलो. आणि मग हॉटेल वर येऊन सामानाची बांधाबांध सुरु.

एक संध्याकाळ नदीकिनारी

एक संध्याकाळ नदीकिनारी

Mexico

Mexico

मेक्सिकोत फिरायला जाताना मुख्यत्वे एक गोष्ट लक्षात ठेवली की आपला प्रवास सोयीस्कर आणि सोप्पा होतो आणि ती म्हणजे, आपलं हॉटेल हे मेट्रो स्टेशन जवळ असावं. म्हणजे एकदा मेट्रो पकडली की बाकी चिंता नाही. Taxi वगैरे च्या भानगडीत सहसा पडू नये.

दुसऱ्या दिवशी पहाटेच उठून पहिली मेट्रो पकडून विमानतळावर पोहोचलो. शॉपिंग मुळे backpacks पाहिलेपेक्षा जड झाल्या होत्या. आणि दुपारपर्यंत टोरांटो ला परत.

मेक्सिको सिटीतील प्रवासात आमच्या आठवणींच्या पुंजीत प्रेक्षणीय स्थळं नसून मुख्य आकर्षण ठरली ती इथली संस्कृती, इथलं फूड, इथली माणसं आणि इथली भाषा. अनोळखा देश, अनोळखी भाषा, पण कुठे न कुठेतरी धागे जुळलेच. स्पानिश च्या दुनियेत ठेवलेलं हे पाहिलं पाऊल आम्हांला बरंच काही शिकवून गेलं. अपरिचित असलं तरी आपलेपणाची जाणीव देऊन गेलं आणि एका वेगळ्याच जगाचं स्वप्न आम्हाला दाखवून गेलं.


Like what you've read? Click here to get our articles delivered to your inbox. 'Like' our Facebook page and help us grow our Facebook community. We share some content exclusively on our Facebook page!

Leave a Comment | Email This Post | Print Print

  • Digg
  • StumbleUpon
  • del.icio.us
  • Facebook
  • Twitter
  • RedditFatal error: Call to undefined function wp_related_posts() in /home/bharar5/public_html/wp-content/themes/prosumer/single.php on line 41